श्री.कमलाकर देसले |
_______________________________________
मुली सारखी माया करतो माझा मुलगा
झाड होऊनी छाया धरतो माझा मुलगा
मुलासारखा,भांडत बसतो,कधी कधी पण-
तुटेल इतके ,ताणत नाही माझा मुलगा
कसा राबतो , रोज रोज मी , पाहून आता
मुलांसारखा खेळत नाही माझा मुलगा
परिश्रमातून ,पैसा येतो , बघितल्यावर
हट्ट जराही करीत नाही माझा मुलगा
थकलो आहे त्याला कळते , मायेने मग-
डोक्यावरती हात फिरवितो माझा मुलगा
मायेने मी पंख खाली त्याला घेतो
उब तरीही मलाच देतो माझा मुलगा
खर्चाचाही हिशेब जेव्हा ,चुकतो माझा
गल्ल्यामधली चिल्लर देतो माझा मुलगा
शहर पेटले दंगल झाली , गर्दी मधुनी
सांभाळून या , सांगत असतो माझा मुलगा
अपंग असुनी ,असुनी अभंग आहे बापाचे मन
सांगत असतो मित्रांनाही माझा मुलगा
मी कवितेशी , बोलत असतो, पाहून तोही
कवितेच्या प्रेमात अडकला माझा मुलगा
पडता ,झडता, रडता मी ही मुलासारखा
बाप होऊनी, धीर देतसे, माझा मुलगा
_____________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा