तुषार देसले- रंग आयुष्याचे !


तुषार देसले

                    ____________________________
                                         रं ग   यु ष्या चे !
        कालच अगदी धो-धो पाऊस बरसला. खरतरं या अचानक आलेल्या पावसाने काहीस वेगळाच वाटलं . पण आपलं मन किती घट्ट आहे या ऋतूंशी याचा प्रत्ययच या पावसाने दिला . पावसाळा - म्हणजे जून ते सप्टेबर- अगदीच लांबला तर गणपती बाप्पांच्या विसर्जनापर्यंत . पण कालचा पाऊस चक्क दसरा दिवाळीच्या तोंडावरच आला होता .
        खरतरं भाद्रपद अश्विन  महिना म्हणजे पहाटेचा लख्ख सूर्यप्रकाश ,चिमण्यांची किलबिल , झेंडूच्या फुलांचा सुगंध अन गडद पिवळा रंग , महिलांची सडा  रांगोळीची लगबग अशी काहीशी या महिन्यातली पहाट. तर दुपार म्हणजे रखरखीत उन . उन अत्यंत कडक तरीही उन्हाळ्या सारखे नाही म्हणजे उन्हात जाणवते ती दसरा दिवाळीची चाहूल . या उन्हाची जणू  आया,बहिणी ,सुना , सासवा वाटच बघतात. वर्ष भराचे पापड ,चकल्या ,डाळी-साळी, धन्य सारं सारं या रणरणत्या उन्हात वाळत घालतात त्यात घरासमोर टाकलेल्या त्या  खाटा त्यावर चकाकणारीती भांडी आणि अशातच हळूच कुठूनतरी ऐकू येणारी all india radio ची धून .अगदी दिवाळीचं जणू काही आपल्याला भेटायला आतुर झाली आहे  असा सगळा माहोल बनून राहतो . मनही अलगद पावसाच्या सहवासातून कूस बदलून दसरा दिवाळीच्या आगमनात रमतं. 
अश्यातच त्या पावसाच्या सारी पुन्हा बरसल्या की एरवी हवासा वाटणारा पाऊस " अरे ! हा कसा काय अचानक आला ?" असा प्रश्न मनात उभा करतो  . याचं  उत्तर मिळेपर्यंत तो जातोसुद्धा आणि आकाश मोकळे होते . मी ही क्षणभर दसरा-दिवाळी ,अश्विन - भाद्रपदाची " आहट " विसरतो . पुन्हा मनात "श्रावणातील घननिळा "उभा राहतो.ओसरलेला पाऊस बघण्याचीही वेगळी मजा असते.मी ती काल अनुभवली .आकाशाकडे नजर भिरकावली अन आकाशात तर जणू "रंगांचीच दिवाळी "सुरु झाल्याचे चित्र दिसले. एकीकडे सप्तरंगाची उधळण करणारा "इंद्रधनू" तर दुसरीकडे अस्ताला जाणाऱ्या सोन्याच्या  गोळ्याची नारंगी-लालसर किरणांची गडद झळाळी .तर तिसरीकडे काळ्या-कुट्ट ढगात दाटलेला  पाऊस .कालच्या या पावसाने खरेतर दिवाळीपूर्वीच रंगांच्या दिवाळीचा उत्सव एकाच वेळी दिला .खरेतर आयुष्याची एक सुंदर समजचं त्यात होती. आयुष्यदेखील अशीच रंगांची उधळण असते.कुठे सुखाचा इंद्रधनू !तर कुठे हवे वाटणारे पण मावळतीचे क्षण !तर कुठे गडद काळा - कुट्ट दुखाचा मेघ !
           आयुष्य उत्सव आहे सुख-दुखाचा ,रंगाचा ,पावसाचा ,दिवाळीचा अन बराच काही..........!

                                                                                                            - तुषार देसले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: