जीवनाचा मीच व्हावा आरसा .


गौतम संचेती । मनमाड

आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पहिजे...
आहे त्यात थोडं वेगळं बघता आलं पाहिजे...

सूर्य तर रोज उगवतो...
आम्ही त्याला रोज बघतो असं म्हणून कसं चालेल...
प्रकाशाचं देण तसं देता आलं पाहिजे...
आयुष्यात थोड वेगळं जगता आलं पाहिजे...

या मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील कवी कमलाकर देसलेच्या कवितेच्या ओळीप्रमाणेच या कवीने तब्बल सात वषेर् मनमाड येथील प्रसिद्ध कवी खलिल मोमीन यांच्याशी कवितेतून आणि गझलमधून केलेला पत्रव्यवहार यावर पुस्तक काढण्याची तयारी सुरू केली असून, काही दिवसांतच ते वाचकांच्या भेटीस येणार आहे.

अपंगावर मात करून प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून थेट महाराष्ट्रातील नामवंत कवीच्या पंगतीत असलेला कवी कमलाकर देसले यांचा परिचय तसा नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्याला नवा नाही या कवीच्या गेय कविता, गझल, भजनांनी सर्वांना वेड लावले आहे. दहावीत चार वेळा नापास होऊनही शिक्षणाची जिद्द त्याने सोडली नाही आणि बघता बघता त्याने 'एमए, बीएड'ही केले. च्या शाळेत शिपाई म्हणून नऊ वषेर् काम केले, त्याच झोडग्याच्या जनता विद्यालयात तो आज शिक्षक म्हणून काम करतो आहे.

सहा भावडंात वडीलभाऊ असलेल्या कमलाकरला वैयक्तिक आयुष्यातही खूप संघर्ष करावा लागला. वडील शिवणकाम करत असल्यामुळे त्यांच्या मदतीला तो धावला. हळूहळू रेडीमेड कपड्याच्या दुकानासाठी कपडे शिवण्याचे काम त्याने अल्पमजुरीत केले. त्यानंतर तो शाळेत शिपाई म्हणून लागला आणि काम करत असतानाच बीए झाला. नाईट शिफ्ट घेऊन त्याने बीएडही पूर्ण केले. नंतर मनमाडमध्ये मराठीमधून एमए केले.

खरं तर कमलाकर एका कवितेत म्हणतो...

का कुणाचा चालवू मी वारसा...

सर्व येणे लाभते सर्वांकडे...

रूप देखावा हवा पण आरसा....

असं असलं तरी त्याच्या आईच्या जात्यावरच्या कवितेने त्याला घडवले... त्याच्या मनात तयार झालेल्या अनेक कवितांवर आईच्या जात्यावरील कवितेच्या लयीचा प्रभाव दिसतो. त्याच्या चाली आणि खिळवून ठेवणारा आवाज सर्वांना मंत्रमुग्ध करतो. त्याच्या या यशात आईचा वाटाही मोठा आहे. तर दुसरीकडे वडिलांना असलेल्या वाचनाच्या आवडीमुळे त्याने मराठी साहित्याचाही सखोल अभ्यास केला आहे. त्यामुळेच आता एमए बीएड झालेल्या कमलाकरला ज्ञानेश्वरीवर पीएचडी करण्याचे वेध लागले आहे.

झोडगासारख्या एका खेडेगावात हा शिक्षक मराठी आणि कार्यानुभव हे विषय शिकवतो. शाळेतील गतिमंचासाठी तो स्वत:च गाणी लिहितो. हामोर्नियमच्या साथीने मुलांना तो तल्लीनतेने शिकवतो. त्याची कविता, त्याची वाचनाची ओढ, अपंगत्वावर त्याने केलेली मात, त्याच्या कुटुंबासाठीच्या तळमळीमुळे पुण्याच्या एका संस्थेने त्याला 'जिद्द' हा राष्ट्रीय पुरस्कार दिला. या पुरस्कारापूवीर् कमलाकरला मिळालेल्या पुरस्कारांची यादी पाहिली; तर त्याचे साहित्यातील स्थान लक्षात येते. साहित्य प्रबोधन पुरस्कार, कवी गोविंद पुरस्कार, मुक्ताई काव्य पुरस्कार, समता काव्य यासारख्या अनेक पुरस्कारांनी तो सन्मानित आहे.

त्याचे 'ज्ञानिया तुझे पायी' हे पुस्तक प्रकाशित असून, त्याचा 'चिमणचारा' हा बालकविता संग्रही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यातच त्याचा मनमाडचे कवी खलिल मोमीन यांच्याशी कविता आणि गझलमधून झालेल्या सात वर्षांच्या पत्रव्यवहारावरील पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरवले असून, त्याचे कामही त्याने सुरू केले आहे.

खरं तर मराठी साहित्यात असा प्रकार आतापर्यंत नाही. त्यामुळे त्यांचा पत्रव्यवहार कसा असेल याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही कवी संवेदनशील आहे दोघंाचे हस्ताक्षर बघितले तर माणूस बघतच राहिल असेच...त्यामुळे या संुदर अक्षरातील कवितेतून व गझलमधून केलेला पत्रव्यवहार मराठी साहित्यप्रेमींना वेगळा अनुभव देईल यात शंका नाही....

अशा या जिद्दी कवीच्या आईच्या कवितेतील ओळी त्याच्या कामालाही समरस ठरतात

सोस... सोसता... सोसता..
तुला हसू कसे आले...
शिशिरातला वसंत कसा पांघरता आले...
मर... मरता... मराता कशी जगणं शिकले...
तुला छळताना संाग कसे दु:खच थकले....

.............. 

निसर्गाशी नाते सांगणारा कवी

कमलाकर देसलेप्रमाणेच त्यांच्याशी कविता आणि गझलमधून पत्रव्यवहार करणारे खलिल मोमीन हेसुध्दा प्रसिद्ध कवी आहेत. भारतीय अन्न महामंडळातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सध्या तेही साहित्यातील गाढा अभ्यास करतात. चित्र काढणे, आपल्या संुदर अक्षरांनी वेगवेगळ्या कलाकृती करणे यासारखे छंद त्यांना सुरुवातीपासूनच आहे.

अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि राज्य शासनाचा उत्कृष्ट वाड्मयनिमिर्ती पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांचे आतापर्यंत निरालय आणि अक्षराई हे दोन काव्य संग्रह प्रकाशित झाले आहेत.

राजकीय पातळीवरील राष्ट्रीय एकात्मतेच्या मुख्य प्रवाहात खलिल मोमीन अशा नावाला महत्त्व आहे. त्यांच्या कवितांची उर्दू व अन्य भाषांमध्ये भाषांतरे झाली असती; तर मुंबई-दिल्ली वाऱ्या घडल्या असत्या. नावाला वलय प्राप्त झाले असते. पुरोगामी म्हणून बांधिलकीवाले म्हणून वा आधुनिकतावादी म्हणून कोणतातरी शिक्का घेऊन मिरवता आले असते. प्रसिध्दीच्या झोतात त्यांना राहता आले असते. परंतु असे काही घडले नाही आणि त्यांनी ते घडू दिले नाही. ते फक्त मराठी कविता लिहीत-वाचत राहिले. अभिनयाचा आधार न घेता ती पेश करीत राहिले. उत्कट जाणिवेच्या क्षणांतील भावाला आकार देत राहिले. त्यामुळेच या कवीचे निसर्गाशीही तितकेचे नाजूक नाते आहे. ते त्यांच्या एका कवितेत म्हणतात.

झाड... हा एवढाच शब्द लिहून मी थांबलो
आणि उल्लेख केला नाही कोणत्याही ऋतूचा
वा तपशिलाने बोललो नाही झाडाविषयी काहीही
म्हणजे असे की... झाड हिरवेगार, बहरलेले निष्पर्ण की वठलेले
तरीही
झाड... हा शब्द उच्चारतांना तुम्ही न कळत
आठवाल एखादा शालीन ऋतू 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: