सांडवा काढू चला ...

भौतिकाचा केवढा अतिरेक झाला ;
पारखा माणूस झाला माणसाला .. 

कारणाने वा विनाकारण असो, पण-
काळजीचा लाभला वर काळजाला ... 

देत जाणे, रिक्त होणे या रितीने -
प्रेम करणे फक्त ठावे प्रेमळाला .. 

पहिलवानाला जयाने लोळवावे ;
तोच सांभाळून घेतो निर्बलाला ..

रेष ओलांडून जाते 'ती' तरीही-
बोलते दुनिया बिचार्‍या रावणाला ..

फेकली छत्री स्वत:हुन तूच राणी ;
बोल का तू लावते या पावसाला ..

संयमाचे धरण झाले खूप मोठे ;
सांडवा काढू चला आता मनाला ... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: